#मत


१ मे ...महाराष्ट्र दिन, मराठी राजभाषा दिन आणि कामगार दिनाच्या सर्वांना खूप शुभेच्छा!

 #मत...काय गंमत आहे ना मराठी भाषेत, ज्या शब्दाला स्वरांची चिन्हे नाहीत (स्वरांशचिन्हे उदा.काना, मात्रा, उकार, वेलांटी इ.) नेमकं त्याच शब्दाला महत्व असतं,.(मराठी राजभाषा दिनानिमित्त तरी असे शब्द आठवूया...वजन, कमळ, गरज, इ..)
त्यातलाच एक शब्द म्हणजे 'मत..' काना,मात्रा,उकार,वेलांटी नसलेला, तरीही अनन्यसाधारण महत्व असलेला शब्द म्हणजे  #मत...

अगदी न कळत्या वयात हा शब्द कानावर पडला तो बहुदा घरातूनच.. मत विचारात घेणे,मत मांडणे, अशी वाक्यं,त्याचे संदर्भ,आणि त्या वाक्यातून ऐकू येणारी विशिष्ट लकब (टोन) पिढी तर पिढी बदलत गेली...

तुमचं मत विचारलयं आम्ही ?...
( दरारायुक्त बोलणारी आजोबांची पिढी)

या घरात माझ्या मेलीच्या मताला काही(काssही) किंमत नाही,... (एकांतात मुसमुसणारी आजी,आईची पिढी)

माझ्या मताला या घरात काही किंमत असेल तर  शप्पथ! (थोड्या धाडसाने व्यक्त व्हायला शिकलेली नवी आई..)

इथे,माझ्या मताला कोण विचारतो?..(घरातील सर्व सूत्र मॉमच्या ताब्यात गेलेला नव्या पिढीचा हतबल डॅडी/डा)

तर अशी वेगवेगळ्या टोनची वाक्य म्हणणारी,किंवा ऐकवणारी एक तरी व्यक्ती प्रत्येक घरात असतेच..आणि समजा असे मत मांडले गेलेच तर, ते आता विचारात घ्यावं की न घ्यावं..हा यक्षप्रश्न To be or not to be...
पेक्षाही जास्त अवघड असतो असं वाटत.कारण कुणा एकाच्या बाजूनं मत द्यावं तर ...त्यावरही उलटसुलट मते ...हां,बरोबर आहे, त्याचच मत तुम्हाला पटणार? आम्ही काय...?अशा अर्थाने, तर दुसरीकडे ...'तुला तुझं,असं काही स्वतंत्र मत आहे की नाही?' असा जाब विचारणारी,किंवा अगदीच आताच्या नव्या पिढीतले समंजस भूमिका घेणारे पालक असतील तर ते "तुझ्या/तुमच्या मताचा मी आदर करतो.." असे म्हणतील.

तर असा हा मता विषयी लिहिण्याचा 'मत प्रवास(ह)' इथपर्यंत येऊन ठेपला आहे.पण आपल हे 'मत ' विविध वाक्यातून असं पुढे येत असले तरी त्यात कधी कधी दम वाटत नाही मग अजून थोडा जोरकसपणा यायला हवा यासाठी 'मत ' व्यक्त करताना एक अस्त्र वापरलं जातं ते म्हणजे,
आपल्या अंगठ्या जवळच पहिलं बोट अर्थात तर्जनी..(index ☝️ finger) ह्या तर्जनीचा वापर करून जेंव्हा मत मांडले जाते ना तेंव्हा समोरच्यावर त्याचा असा काही प्रभाव पडतो की ज्याचं नाव ते!
बघा...वरील सर्व वाक्य पुन्हा या तर्जनीचा वापर करत मनातल्या मनात एकदा म्हणा....😀

असो...तुम्हाला या पोस्टवर 👆 काही मत मांडायचे असेल तर तो अधिकार नक्की बजावा, शेवटी तुमच्या मताचा (मतमतांतर असली तरी) मी आदरच करते... त्यामुळे तुमचं मत माझ्याबद्दल म्हणजे लेखनाबद्दल काहीही असू द्या ही पोस्ट नक्की लाईक करा...पण #मत #VOTE नक्की द्या,आणि आजपासूनच लोकशाहीचा उत्सव आनंदात साजरा करुया.
जय महाराष्ट्र!🚩

©विशाखा कुलकर्णी...👆🖋️
१ मे २०२४
चिंचवड.


Comments

  1. अरे वा!!'मत' याविषयीचे परखड मत छानच!!.....हे माझं आपलं न विचारताच दिलेलं 'मत'👆👍

    ReplyDelete

Post a Comment