वर्ष२०२४ -धन्यवाद!

#वर्ष २०२४ - धन्यवाद!

धन्यवाद!
आज ३१ डिसेंबर २०२४.. वर्षातील शेवटचा दिवस.या ३६५दिवसांचा मागोवा घ्यायचा तर मला अनेक क्षणांना धन्यवाद द्यायचे आहेत. 
मी जे छान,उत्तम ते करू शकले, ज्याचा मला मनापासून निरपेक्ष आनंद मिळाला,
नवीन काही करण्याची उमेद मिळाली त्या प्रत्येक सकारात्मक क्षणाला धन्यवाद! स्वतःची क्षमता ओळखता आली,तर कधी 'जमतंय की '..असा आत्मविश्वास दिला त्या क्षणाला धन्यवाद! या वर्षभरात अवतीभवती कित्ती कायकाय छान सुरू होतं , जिथे शक्य झालं त्याचा प्रत्यक्ष आनंद घेता आला त्या क्षणाला धन्यवाद!
जे काही निसटले त्याची हुरहूर आहेच पण तरीही 'जमवलं तर जमतंय' अशी नवी जाणीवही दिली त्या क्षणाला धन्यवाद!आणि हो..माझ्या एखाद्या छोट्याशा यशात कौतुकाची थाप देणाऱ्या माझ्या प्रत्येक सुहृदाला धन्यवाद कारण त्या क्षणाने सातत्याची जाणीव दिली.
पण सगळेच असे गुडी-गुडी क्षण थोडेच असतील? मग त्या सोबत येणाऱ्या  प्रत्येक हळव्या,भावूक क्षणालाही धन्यवाद द्यायलाच हवे की....कारण त्याने नवा अनुभवरुपी धडा दिलाय.एखाद्या भावनिक हिंदोळ्याच्या क्षणाने तोल सावरायला शिकवले...तर या वर्षातल्या एखाद्या दिवसाने 'आपलं काय बरं चुकलं असेल' हे तटस्थपणे बघण्याची नजर दिली. जे सामोरे आले ते स्विकारण्याची क्षमता रुजवणाऱ्या त्या अनाहूत क्षणाला धन्यवाद! 

भले बुरे घडून गेलेल्या त्या प्रत्येक क्षणाला सामोरं जाताना उद्याचा नवा क्षण येईपर्यंत..
..."जरा विसावू या वळणावर"..अशा या क्षणिक वळणालाही.. धन्यवाद!2024

©विशाखा..✍️

Comments