मराठीचे भवितव्य : आपली जबाबदारी

मराठीचे भवितव्य : आपली जबाबदारी

भाषा हे संवादाचे माध्यम किती प्रभावी असू शकते याची प्रचिती नुकतीच गौरी -गणपती उत्सवाच्या निमित्ताने आली.वयाची सत्तरी ओलांडलेल्या दोन आज्या आपले मराठी पारंपरिक खेळ खेळत,गाणी म्हणत असलेली एक चलचित्रफित होती आणि ..'या नणदा ला रुसायाची खोड ग..' या लोकगीताचा सहज आनंद घेणाऱ्या स्त्रियांची चित्रफीत, या दोन्हीमधून ग्रामीण भाषेतला गोडवा मनाला स्पर्शून गेला.या चलचित्रफितीना (Reel)काही हजार लोकांनी रूचल्याचे(लाईक्स)नमूद केले हे विशेष. 

आपली भाषा कशी टिकवून ठेवावी?
त्यासाठी आपली जबाबदारी काय?याची ही दोन बोलकी उदाहरणे. ती बघताना लक्षात आले की आपली मातृभाषा ही आपली 'चौथी मूलभूत गरज' आहे असा विचार प्रत्येकाने गांभीर्याने केला तर मराठीचे भवितव्य नक्कीच उज्ज्वल असेल.
जागतिकीकरण,संगणक,डिजिटल युगात आपल्याला टिकून राहायचे तर वाघिणीचे दूध असलेली इंग्रजी भाषा महत्वाची आहे. आता तिचा सातत्याने वापर करावा लागतो हे सत्यही मान्य,पण तरीही -
'मी भाषेचा,भाषा माझी'..असे मराठीशी असलेले आपले नाते ‘दृढ’ करायला हवे. मराठी भाषेचा अभिमान,अस्मिता मिरवताना प्रत्यक्ष व्यवहारात वापरताना मात्र याकडे पाठ फिरवतो.केवळ ‘मराठी दिना’इतकेच त्याचे महत्व राहिले तर कालौघात आपली मराठी खरचं ‘दीन' होईल.

स्वदेश,स्वधर्म,याइतकेच 'स्वभाषेचा अभिमान आग्रहपूर्वक जोपासला पाहिजे.
तिची अवहेलना थांबवली पाहिजे. 'हिचे पुत्र आम्ही,हिचे पांग फेडू' l अशी भाषेविषयी प्रत्येकाचीच कृतज्ञ भावना असावी त्यासाठी जोड हवी स्व-निग्रहाची.

आपल्या पाल्याला शिक्षण देण्याचे माध्यम, मराठी शाळांची वस्तुस्थिती,पालकांची अपरिहार्यता इ.बाबतीत मतमतांतरे असतीलही पण स्वतः मराठी माध्यमातून शिकलेल्या "मिंग्लिश पालकाने" आपल्या मुलावर मातृभाषिक संस्कार करण्याबाबत आग्रही असले पाहिजे.मराठी शब्दसंपत्तीचा वारसा पुढच्या पिढीला उपलब्ध करून देण्यासाठी कुटुंबात आजीआजोबा पाहिजेच.त्यांच्याकडून ऐकलेली अंगाई गीते,बडबडगीते,घास भरवताना सांगितलेल्या चिऊकाउच्या,चांदोमामाच्या गोष्टी यामुळे त्यांचे भावजीवन,
विचारक्षमता,संवेदनशीलता,
कल्पनाविलास यांचा नक्कीच विकास होईल.
मारुती चितमपल्ली यांच्या आईने त्यांना लहानपणी शेंदरी,केतकी,लाल,डाळींबी या रंगाविषयी मातृभाषेतून दिलेलं ज्ञान पुढे ‘चकवा चांदण’या आत्मचरित्रात निसर्गाच्या रंगाचं हुबेहूब वर्णन करताना उपयोगी ठरले.त्यामुळे आपल्या पाल्याला हातात भ्रमणध्वनी देऊन तासनतास गोष्टी बघायला देण्यापेक्षा मातृभाषेतून संवादाची देवाणघेवाण झाली पाहिजे.

शहरीकरणाचा परिणाम भाषेवरही झाला.
शुध्द,अशुध्द,शहरी,ग्रामीण असा भाषाभेद वाढला.त्यासाठी बोलीभाषांचे व्याकरण त्या बोलीभाषेचा,साहित्याचा प्रसार करणे गरजेचे आहे.भाषेसोबतची हजारो वर्षांची परंपरा लुप्त होऊ नये यासाठी बोलीभाषेतील शब्दांचे संवर्धन, दस्तऐवजीकरण करणे ही आपलीच जबाबदारी आहे.

आता दृश्यमाध्यमे प्रभावी झाल्याने असा प्रयत्न मराठी मालिकातून होतो ही एक जमेची बाजू आहे - ‘मग,'चालतंय की'...या बोलीभाषेतील राणादाच्या संवादाने प्रेक्षकांचा जीव खरोखरच रंगला.

भाषा शुध्दीचा अतिरेकी आग्रह न करता 
आपल्या परिसरात,कामाच्या ठिकाणी असणाऱ्या अमराठी मंडळींना मराठी ऐकण्याची,बोलण्याची सवय लावली पाहिजे त्याआधी आपणच मराठी भाषेचा न्यूनगंड,तुच्छभाव दूर करायला हवा.

संत,पंत,तंत परंपरेने नटलेल्या आपल्या मराठीचे शब्दभांडार अभिजात आहे.पण
भाषेचे वाहक असलेली नवतरुणाई 
सध्या waaw,'सही'असे शब्द वापरते त्यांना ’सही’ला मराठीत स्वाक्षरी म्हणतो हे रुजवताना सुंदर,अप्रतिम,छान या अर्थाचे शब्द प्रचलित करायला पाहिजे.

सोशल माध्यमातून दिले जाणारे शुभेच्छा संदेश ase type karun लिहिणे टाळावे लिहिताना शुद्ध शब्दाचे भय वाटू नये यासाठी ’लिहूया बिनचूक मराठी’ सारख्या पुस्तकांचा संग्रह,प्रसार करणे ही आपली जबाबदारी आहे.भाषेचं महत्व सांगणारी पथनाट्य, मराठी पाट्या,प्रबोधनात्मक कार्यक्रमातून जागरूकता वाढली पाहिजे.सध्या दिनदर्शिकेवर मराठी कविता,सदऱ्या वरील(टी-शर्ट) मराठी वचने यासारख्या नव्या बदलत्या माध्यमांचा वापर होतोय तो आधिक वाढला पाहिजे.
 
संत ज्ञानेश्वर माउलींनी वर्णन केलेली सुंदर ‘मर्‍हाटी भाषा वृध्दींगत करण्याची जबाबदारी पालखीचे भोई असलेल्या प्रत्येक मराठी भाषिकाने अभिमानाने खांद्यावर पेलली पाहिजे,कारण..

     जैसी दीपांमाझि दिवटी। 
    कां तिथींमाझि पूर्णिमा गोमटी।
  तैसी भाषांमध्ये मर्‍हाटी । सर्वोत्तम।

धन्यवाद!

सौ.विशाखा विश्वास कुलकर्णी. 
चिंचवड.






Comments

Post a Comment