अंगठा बहाद्दर - "एकलव्य"

       
🌸गुरूपौर्णिमेनिमित्त गुरूंना वंदन!🌸

लहानपणी शाळेत आपण प्रत्येकाने गुरुपौर्णिमेला हमखास सांगितलेली एक गोष्ट म्हणजे गुरू द्रोणाचार्य आणि एकलव्य या शिष्याची. किंबहुना गुरू-शिष्याच्या या अनोख्या नात्याच्या महतीशिवाय गुरुपौर्णिमा साजरीच होत नसे. अतुलनीय ज्ञान,युद्धतंत्र व धनुर्विद्येत निपुण असलेले गुरू द्रोणाचार्य आणि सातत्य, साधना याचं दुसरं नाव म्हणून ज्ञात असलेला धनुर्धारी शिष्य एकलव्य हे दोघेही महानच.

महत्वाकांक्षी एकलव्य केवळ गुरूंच्या मूर्तीसमोर बसून धनुर्विद्या शिकला आणि जेंव्हा गुरुदक्षिणा म्हणून उजव्या हाताचा अंगठा गुरुचरणी अर्पण कर असे गुरूंनी सांगितले तेंव्हा तात्काळ न डगमगता तो अंगठा आनंदाने गुरूचरणी अर्पण केला. तेंव्हा त्याची ही एकनिष्ठता बघून गुरूंनी आशीर्वाद दिला की, 'तुझ्या गुरुनिष्ठेचे, गुरुभक्तीचे स्मरण या पृथ्वीतलावर कायम होत राहील'. एकलव्याच्या तपस्येच हे फलितच म्हणावं लागेल.

पुरातन काळापासून चालत आलेली गुरुपौर्णिमेची ही परंपरा आज नक्कीच बदलली,अनेकांना गुरूस्थानी मानून किंवा 'गुरू' करून त्यांनी दिलेली शिकवण आपल्या यथाशक्ती शिष्याने ती ग्रहण केली, गुरूंच्या या ऋणातून उतराई होणे शक्य नसले तरी योग्य तो आदर, मानसन्मान करून त्याविषयी वेळोवेळी कृतज्ञता व्यक्त केली जाते.

पुढे काळ बदलत गेला. आपण बुद्धीचातुर्याने हळूहळू खूप प्रगती करत गेलो. 'बिनभितींची शाळा इथली लाखो इथले गुरू'. असं लिहिणाऱ्या गदिमांची ती कविता आजही चपखल लागू होते. आपण अनेक तंत्र विकसित केली,नवीन टेक्नॉलॉजी (तांत्रिक)च्या प्रगतीने अवघ जग जवळ आले. फोन,कॉम्प्युटर, सोशल मीडिया, वेबसाईट्स हे आता सध्याच्या नव्या जगाचे 'तंत्रगुरू' किंवा 'Tech Guru'' झाले आहेत. एका की-बोर्ड नामक धनुष्यावर आपली बोटे अगदी सफाईदार फिरविणारा नव्या युगाचा हा 'एकलव्य शिष्य' आता आपल्या 'अंगठ्या'च्या जोरावर म्हणजेच एका क्लिकवर अवघ्या 'ब्रह्माडातील माहितीचा अचूक वेध घेतोय. गुरू द्रोणाचार्यांनी दिलेला तो आशीर्वाद आजही खरा होतोय असं वाटतंय ना? 

या नव्या Tech-गुरूंचा अखंड सहवास त्याला मिळाला. तंत्रगुरुचा हा जिज्ञासु एकलव्य शिष्य इथे मिळणाऱ्या अफाट ज्ञान,माहितीच्या खजिन्याने रोज नवं काही तरी शिकु लागला,ते ज्ञानग्रहण करण्यात व्यस्त झाला.आपल्याला पडलेल्या पंचमहाभूतांपैकीच्या कोणत्याही प्रश्नाची अद्ययावत माहिती,शंकानिरसन इथल्या गुरू कडे त्वरित मिळतेच. गुरुपौर्णिमेनिमित्त येणाऱ्या मेसेजेसच्या चित्रांमध्ये (image)  "Google" या अक्षराला 'गुरू' मानून मानवरूपी शिष्याने नमस्कार केलेला आपण प्रत्येकाने बघितला असेलच. तर असा हा 'तंत्र गुरू' आपल्यापुढे ज्ञानाचं भांडार खुल करतो, मुक्तहस्ते सर्व माहिती द्यायला तत्पर असतो. विश्वाच्या गर्भात दडलेली सगळी रहस्ये शोधून प्रगतीची नवी दालने खुली करून देतो. फक्त त्यातलं काय चांगलं ग्रहण करायचे, कोणतं वाईट दुर्लक्षित करायचं याचा मंत्र आपला आपल्यालाच म्हणजे या आधुनिक शिष्याला त्या 'एकलव्यालाच' अवगत करायला लागतो.

कोणतंही 'तंत्रज्ञान' हे 'गुरु'ची जागा कधीच घेऊ शकणार नाही हे मान्यच आहे. शिष्याच्या प्रगतीचे चढ-उतार, येणाऱ्या समस्या,अडचणी त्यांच्या चुकांची जाणीव, त्यासाठी घेतलेली त्यांची परीक्षा, हे सगळं तपासून बघायला हे तंत्रज्ञान उपयोगी नाही, त्यासाठी एक उत्तम मानवरूपी गुरूच आपली खरा मदत करू शकतो. पण तरीही बदलत्या काळा बरोबर पुढे जायचं असेल तर या नव्या तंत्रगुरूंचे पाय आपल्या सर्वांना धरायला लागणारच आहेत.आणि आपण हे जितके लवकर स्वीकारू तितके ते आधिक फायदेशीर नक्कीच ठरेल. मागील कोरोना युद्ध प्रसंगाची आठवण करून बघा. त्यावेळी या तंत्रगुरूंची विद्याच तर आपल्याला उपयोगी पडली हे नाकारून कसे चालेल? कोणत्याही कठीण काळाला सामोरं कसं जायचं याचं जे शिक्षण प्रत्यक्ष गुरू देत होते तेच सगळं या तंत्रगुरुने ही आपल्याला शिकवले. नवनवीन विचारांचे आदानप्रदान झाल्याने या कठीण काळातून बाहेर पडण्याचे अनेक मार्ग शोधले गेले. अनुभवांनी समृद्ध असलेल्या सर्व जुन्या जाणत्या गुरूंच्या ज्ञानाचा वापर आजच्या नव्या आधुनिक एकलव्याने करून घेतला, त्यात स्वतःच्या कौशल्याची ही भर घातली म्हणून तर कितीक गोष्टी सुकर झाल्या. या कठीण काळात आलेले अनेक मदतीचे हात,दिलासा आणि उभारी  देणारे संदेश, आपत्तीवर मात करायचे उपाय, या एकलव्यानेच तर शोधून दिले.

आपल्याला पडणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तर शोधून, ज्ञानात भर घालणाऱ्या ह्या तंत्रगुरुला 'गुरुदक्षिणा' म्हणून कितीतरी आधुनिक 'बहाद्दर एकलव्यांनी' अविश्रांत मेहनत घेऊन आपला 'अंगठा' आजही काढून दिलाय हे आपण विसरायला नको. त्यामुळे एकलव्य त्या गुरू द्रोणाचार्यांचा असो की आपल्या आधुनिक तंत्रगुरूंचा...या 'अंगठा बहाद्दर' एकलव्याचे महत्व तसूभरही कमी होत नाही बघा ना! आजही सरकारी कामात निळ्या शाईत उमटवलेल्या (डाव्या का होईना )अंगठयाची निशाणी घेणं म्हणूनच बहुदा रूढ झालं असावं.अहो, इतकंच कशाला सोशल माध्यमाच्या वापरात असलेल्या like चा thumb म्हणजे अंगठा, तो सुद्धा (लगेच तपासून बघा😄) एकलव्याच्या 'गुरुनिष्ठेच  स्मरण म्हणून पृथ्वीतलावर अबाधित राहिलंय' असं वाटतंय..अशा या अंगठा बहाद्दर एकलव्याचे महत्व तुम्हाला पटलं असेलच. मग ब्लॉगवरील माझा हा लेख आवडल्याचा एक like चा 'अंगठा' (ठेंगा नव्हे😃)द्यायला मात्र अजिबात विसरू नका बरं का!

टेक्नॉलॉजी अर्थात तंत्रगुरूंची दिक्षा घेतलेली आजची आधुनिक एकलव्य


✍️विशाखा कुलकर्णी..👍😄



Comments

  1. 👌🏼👌🏼 सुंदर लेख 🌹🌹🌹

    ReplyDelete
  2. खूप छान लेख👌👌👍👍🌹❤️

    ReplyDelete
  3. खूप छान लेख !!!

    ReplyDelete

Post a Comment