माझी मराठी

मराठी भाषा विभाग राज्य मराठी विकास संस्था आणि मिती क्रिएशन्स आयोजित भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम - 'वाचन प्रेरणा दिन' निमित्त 'माझी मराठी' या विषयावर  लेख स्पर्धा घेतली.या लेख स्पर्धेसाठी आयोजकांनी दिलेल्या मुद्द्यांना अनुसरुन लेख लिहायचा होता.ते ही ५०० शब्द! अर्थातच मराठी भाषेविषयी कितीही लिहू तितकं कमीच आहे.त्यामुळे थोडक्यात पण सर्वसमावेशक लिहायचे आव्हान होतं. माझ्या मराठी बद्दल व्यक्त होण्याची संधी या स्पर्धेतून मिळणार म्हणून लिहिण्याचा विशेष आनंद! 

या लेख स्पर्धेचे निकाल फेसबुक live कार्यक्रमात जाहीर करण्यात आले.यावेळी परिक्षक म्हणून लेखिका अपर्णा बेडेकर,लेखक,अभिनेता संजय मोने,लेखिका हर्षदा बोरकर यांचे "माझ्या मराठी" करिता आपण प्रत्येकजण काय प्रयत्न करू शकतो हे सांगणारे मनोगत अगदी विशेषच होते.सर्व निकषांतून माझा लेख निवडला यासाठी परीक्षकांचे धन्यवाद! एकूणच लेख स्पर्धेचा अनुभव नवं  लिहायला प्रेरणा देणारा होता. तुम्ही सर्वांनी केलेलं अभिनंदन नवीन लिहायला उत्साह देणारे आहे. खूप खूप धन्यवाद!


----------------------------------
माझी मराठी '

माय मराठी! 
तुझिया पायी तनमनधन मी वाहियले  
तुझिया नामी, तुझिया धामी 
अखंड रंगुनि राहियले |

कवयित्री संजीवनी मराठे यांच्या या कवितेने 'माझी मराठी' या स्पर्धेत लेख लिहायला मला प्रवृत्त केले.खरंतर आईच्या गर्भात असल्यापासूनच ज्या भाषेसोबत माझी नाळ घट्ट विणली गेली,तिच्या विषयी जिवीचा जिव्हाळा निर्माण न होईल तरच नवल! "चारी वर्णातुनी फिरे सरस्वतीची पालखी" - अशा समृद्ध भाषेचे 'मराठीपण'अभिमानाने मिरवणारी या पालखीची मी एक सर्वसामान्य भोई! त्यामुळे 'माझी मराठी' विषयाबद्दल लिहिताना शब्दांनी माझी सोबत करावी ही सरस्वती चरणी प्रार्थना!

संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात त्याप्रमाणे कोणताही अवघडात अवघड विषय सोपा करून सांगणारी भाषा म्हणजे माझी मराठी भाषा. अमृतातेही पैजा जिंकणाऱ्या या रसाळ मराठी भाषेला सुमारे २००० वर्षांपूर्वीचा इतिहास आहे.'गाथा सप्तशती',म्हाइंभटांचे लीळाचरित्र,
अक्षीचा देवनागरीतला मराठी शिलालेख,नाणेघाटातील ब्राह्मीतील शिलालेख....असा माझ्या मराठीचा सुरू झालेला प्रवास ‘श्री चामुण्डेराये करविले’असं श्रवणबेळगोळच्या शिलालेखावर लिहिलेल्या पहिल्या वाक्यानंतरही सुरूच राहिला.पोथ्या, ताम्रपत्र,जुने दस्तऐवज,बखर, ऐतिहासिक पत्रे असा अनेक टप्प्यातून तो उत्क्रांत होत गेला. हे दाखले बघितले की मराठीच्या अभिजातते विषयी अभिमान वाटतो. पण कोणतीही भाषा दीर्घकाळ टिकण्यासाठी ती वारंवार वापरली पाहिजे.त्यातले शब्द,त्यांचे अर्थ समजून घेऊन ते प्रवाहित ठेवणं ही त्या भाषा संवर्धनाची खरी गरज असते. नाहीतर…

"भाषा मरता देश ही मरतो, संस्कृतीचा ही दिवा विझे"

हे ध्यानात घेतल पाहिजे.कारण आजच्या तंत्रज्ञान आणि जागतिकीकरणाच्या रेट्यात 'आपुल्या घरात हाल सोसते मराठी | अशी मराठीची 'दीन'अवस्था झाली आहे.आ-आई चा शिकणाऱ्या मराठी मुळाक्षरांचा तक्ता केंव्हाच गायब झाला आणि 'ए फॉर ॲपल' मधे 'Myबोली' दंग होऊन गेली आहे. प्रत्येक मराठी वाक्यात चार इंग्रजी शब्द असल्याशिवाय वाक्य पूर्णच होत नाही. माझ्या मराठीची ही 'धेडगुजरी' सद्यस्थिती मनाला अस्वस्थ करून जाते. 

"इंग्रजीला वाघिणीचे दूध"म्हणणाऱ्या विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी इंग्रजीच्या अपरिहार्यतेचे महत्व जाणले तरी मराठी भाषेला कधीच हीन लेखले नाही,जे आपण सोयीस्करपणे विसरतो. जगाच्या व्यवहारात संवाद व संपर्कासाठी इतर भाषा शिकणे ही गरज आहेच.पण 'परभाषेत पारंगत' होताना मातृभाषेची साधनाही अखंड सुरू असावी, Smart पणाची 'वसने' परिधान करण्याच्या नादात 'माय मराठीचे' वस्त्रहरण होऊ नये इतकंच!                                 
माय मराठी! तुझियासाठी वात होउनी जळते मी |

असा निग्रह प्रत्येकाने करायला पाहिजे.तनुमनू झालेल्या माझ्या मराठीला पुरुज्जीवित करणारं काही ठळक वर्णन करता यावे,असे तीव्रतेने वाटले.म्हणूनच लहानपणी मनावर कोरलेला मुळाक्षरांचा तक्ता उपयोगी आला. माझ्या मराठीची खरी ओळख काय आहे ह्या आशयाची "अ ते ज्ञ" कविता लिहिली ती केवळ अभिजाततेचा वारसा आणि भाषा सौंदर्याचे लेणं ल्यायलेल्या या 'माझ्या मराठी'ला पुन्हा वैभवसंपन्न करण्यासाठी!
 
अ ते ज्ञ 
    
अ -अभिजात दर्जा आहे माझ्या मराठी भाषेस
आ - आर्य संस्कृत प्राकृताचा मोठा इतिहास |
इ - इथे जन्मती वृत्त,आर्या,अभंग नि ओवी
ई- ईश समान बोलीभाषेची ऐका ही थोरवी |

उ - उघडली शब्द वैभवाची इथली कवाडे
ऊ- ऊर भरून येतो,गाता या मातीचे पोवाडे |

ऋ- ऋण थोर हा मिळे वारसा साहित्य संपदेचा
ए - एक एक शब्द इथला असे अमृताचा 
ऐ- ऐकता बोलता स्फुरे कणकण बाहूचा |

ओ - ओजस्वी भाषा, रसाळ, रांगडी जपे सौंदर्यता
औ - औत्सुक्य वाटे द्वयी अर्थाची पाहुनी विविधता 
अं - अंगी भिनली टाळ चिपळ्यांची जयघोषता |
अ:
क - कशी वळवावी तशी भाषा ही वळते
ख - खसखस नर्म विनोदाची सहजची पिकते |

ग - गवळण,भारुड,लोकगीते करिती प्रबोधन
घ - घटकाभरी ऐकता तनमन होई बेभान |
ड. -
च - चला सांगू जगास या भाषेची महती
छ - छत्र वैभवी संस्कृतीचे असे आम्हा वरती |

ज - जगवू मोडी लिपी बोलू, लिहू, देवनागरी
झ - झटकुनी टाकू मळभ जे आले हे तिजवरी |
ञ-
ट - टणक अभेद्य कवचाचा बाणा हा मराठी
ठ - ठणकावूनी नाठाळांच्या माथी हाणू काठी |

ड - डगमगली ना कधी लेखणी,
कवी,लेखकांची
ढ - ढळे तोल ना नसे पायमल्ली विचारांची 
ण - बा'ण' शब्दांचे भात्यात राखितो उंची प्रतिभेची |

त - तळपत्या खडगाची धार इथल्या शब्दांस
थ - थरथरली ना परखड वाणी कुणा बोलण्यास  
द - दर बारा कोसांवर बदले भाषा ही खास
ध - धन्य या भूमीतील सर्वांचा एकच हो श्वास 
न - नवविचार प्रेरणांची धरितो आम्ही कास |

प - पदस्पर्शाने संतांच्या होई भाषा ही पावन
फ - फडकविला झेंडा अटकेपार वाढविली शान|
ब - बहुत जाहले साहित्यिक,कवी,प्रतिभावान
भ - भरभरून घ्यावे किती न होई समाधान
म - महान,उज्वल भाषेचा या उचित हो सन्मान |

य - यमक, उपमा,उत्प्रेक्षांचे चढविले अलंकार
र - रविकिरणांचे तेज पसरले शब्द सृष्टीवर |
ल - लटक्या शृंगाराचा ठेका धरी लावणीवर
व - वक्तृत्वाची पडे मोहिनी इथल्या रसिकांवर |
श - शमला नाही घुमतो अजुनी क्रांतीचा जयकार
ष - षड्रीपुंना काबीज करणे हा या भाषेचा संस्कार |

स - सदैव ठेवीते वरदहस्त इथे सरस्वती
ह - हरघडी नव-रस रंगांनी सहजी बरसती 
ळ - लळा लाविते भाषा जी जोडीते अक्षय नाती 
क्ष - क्षणभरी ना विसरू या भाषेचे ऋण आम्हावरती
ज्ञ - ज्ञानियांच्या पुजकांची कळो जगास महती |
------------------------
धन्यवाद!
दि : ५ऑक्टोबर २०२३.      
नाव : सौ.विशाखा विश्वास कुलकर्णी (चिंचवड,पुणे)
गट क्रमांक ३ : (वय वर्ष ३० च्या पुढे)


Comments

  1. अतिशय समर्पक आणि सुंदर लेखन ताई

    ReplyDelete
  2. अ ते ज्ञ पर्यंतचा शब्दप्रवास अतिशय चपखल शब्दांत वर्णत केलास👌🏻👌🏻

    ReplyDelete
  3. खूपच अभ्यासपूर्ण लेखन,अगदी बारकाव्यानिशी मराठीची उत्क्रांती विशद केली आहेस...तसेच मराठीला आलेली मरगळही अ ते ज्ञ ची बाराखडी वाचल्यावर प्रत्येक आद्याक्षरातून केलेले वर्णन वाचताच दूर होते!!सुंदर व मुद्देसूद भाषाशैली!!👌खूप खूप अभिनंदन💐💐🙏

    ReplyDelete
  4. खूप सुंदर लेखन ! अ ते ज्ञ ही मुळाक्षरांवरील शब्द लावण्य अप्रतिम आहे!

    ReplyDelete

Post a Comment